गेवराई |
गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा येथे एका आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून नातेवाइकांनी यावर आक्षेप घेतला आहे. असे असले तरी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झाली नव्हती. त्यामुळे मृत्यूचे गूढ कायम आहे.
अंकिता बळीराम घवाडे (वय २५) आणि तिची मुलगी शिवप्रिती घवाडे (वय २) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. अंकिता घवाडे यांनी आपल्या राहत्या घरात, माळवदाच्या हलकडीला आधी मुलगी शिवप्रितीला गळफास दिला आणि नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी परतल्यानंतर पती बळीराम घवाडे यांना ही घटना दिसली. यानंतर नातेवाइकांनी तत्काळ दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात नेले. अद्याप आईने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर आणि बीट अंमलदार सचिन कोरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
आई व मुलीच्या निधनाची बातमी समजताच अंकिताच्या माहेरच्यांसह सासरच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रात्री साडे सात वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. तसेच पोलिस पंचनामा करण्याच्या तयारीत होते.
सासरच्या छळाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप
अंकिताचे मालेगाव येथील बळीरामसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा संसार सुखाने सुरू होता, असे असतानाच अंकिताने सोमवारी टोकाचे पाऊल उचलले. तिच्या भावाने मात्र, यावर आक्षेप घेतला आहे. सासरच्या छळाला कंटाळूनच आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप राम जाधव यांनी केला आहे.