जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर हगवणे बंधुंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पदनावती करण्यात आली होती. यानंतर आता सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे.
आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे. सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा 100 टक्के फॉल्टी आहे. नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही. गोष्ट किती खालच्या थराला गेल्यात याचं हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची 150 कोटींची मालमत्ता आहे. ही प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून किती वर्षांनीही बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले. भविष्यात आष्टी मतदार संघात हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असे आवाहनही धस यांनी केले. आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास आय पी एस जालींदर सुपेकर यांनी नकार दिला आहे. आमदार धस यांनी केलेल्या आरोपांबाबत आपणाला माहिती नसल्याचे ते म्हणाले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते.