बीड |
जिल्ह्यातील केजमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
विष्णू चाटे असे आरोपीचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे. या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचे निलंबन करण्यात आले.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर 10 व्या दिवशी पोलिसांना चौथ्या आरोपीला अटक करण्यास यश मिळाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अद्याप फरार आहेत.
आरोपी विष्णू चाटे कोण आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. विष्णू चाटे हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज तालुकाच्या अध्यक्ष होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याला सह आरोपी करण्यात आल्यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा देखील धनंजय मुंडे यांचा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराडसोबतही त्याचे निकटचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.