लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या.
आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड होताच बीडच्या परळी शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. कार्यकर्त्यांनी लक्ष्मीबाई टॉव परिसरात एकत्रित येत फटाक्यांची आतिषबाजी करत धनंजय मुंडे यांच्या निवडीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
दरम्यान धनंजय मुंडे हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्या उठावानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. राष्ट्रवादीत दोन गट पडले एक राष्ट्रवादी अजित पवार गट तर दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गट, या सर्व घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून अजित पवार यांना साथ दिली. भाजपला पाठिंबा जाहीर करताना अजित पवार यांच्यासोबत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता. दरम्यान त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.