बीड |
शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या नावाखाली दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत, बीड सायबर पोलिसांनी तक्रारदाराचे ४ लाख ६८ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते ही रक्कम तक्रारदार विलास ज्ञानोबा नाईकवाडे यांना सुपूर्द करण्यात आली.
बीड शहरातील रहिवासी विलास ज्ञानोबा नाईकवाडे यांना ‘ग्लोबल कॅपिटल एफ एक्स’ (Global Capital FX) नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दररोज ०.५० ते १ टक्के व्याज मिळेल आणि तीन महिन्यात रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून नाईकवाडे यांनी २४ फेब्रुवारी २०२५ ते ३ एप्रिल २०२५ या काळात ५ लाख ३८ हजार ५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले, तर ४ लाख ५० हजार रुपये आरोपी ज्ञानेश्वर दिगांबर चाटे याला रोख स्वरूपात दिले. अशा प्रकारे त्यांची एकूण ९ लाख ८८ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती.
पोलिसांचा तांत्रिक तपास आणि कारवाई
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाईकवाडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गु.र.नं. २७/२०२५ अन्वये बी.एन.एस. कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६६, ६६(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक खात्यांच्या माहितीवरून तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींचे बँक खाते शोधून त्यातील २ लाख ६८ हजार रुपये गोठवले (Freeze केले). तसेच आरोपीकडून २ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. अशी एकूण ४ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे, सपोनि संदिप अराक, सहा. पोउपनि भारत जायभाये, पोह विजय घोडके, निलेश उगलमुगले आणि श्रीकृष्ण टेकाळे यांच्या पथकाने केली.
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कंपनीत किंवा ‘दामदुप्पट’चे आमिष दाखवणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.


