- Advertisement -
गेवराई |
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. आज, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी गेवराई पोलिसांनी शहरात धाडसी कारवाई करत सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा बनवण्याचे साहित्य असा एकूण ११ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गेवराई शहरातील ‘शानदार पान सेंटर’ येथे मानवी आरोग्यास घातक असलेल्या माव्याची निर्मिती आणि विक्री होत होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सकाळी एका विशेष पथकाद्वारे या केंद्रावर छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळावरून मावा तयार करण्यासाठी लागणारे सुगंधी तंबाखू, सुपारी, चुना आणि इतर घटक हस्तगत केले. या कारवाईत समीर मेहबुब शेख (वय ३९, रा. गायकवाड जळगाव, सध्या रा. पांढरवाडी फाटा, गेवराई).
अमजद जाफर शेख (वय ४१, रा. विवाह मांडवा, जि. छ्त्रपती संभाजीनगर, सध्या रा. कोरबु गल्ली, गेवराई). आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मावा बनवण्याचे २ मिक्सर, कच्चा माल, एक स्विफ्ट कार आणि एक इलेक्ट्रिक दुचाकी (Praise Pro). असा एकूण ११,९८,८०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि संतोष जंजाळ, पोउपनि राम खोत, पोह/हंबर्डे, पोकॉ/जितेंद्र ओव्हाळ आणि मपोकॉ/कोंता यांचा समावेश होता.
सध्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये अजून कुणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे गेवराईतील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


