7.3 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img

मध्यरात्री सुनसान मार्गावर  बंद पडली कार; अन्  देवदूत बनून धावले पोलीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड. |

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना बीड बायपासवरील मांजरसुंबा परिसरात मध्यरात्री घडली. पैठणहून आपल्या घराकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार निर्जन स्थळी बंद पडली असता, गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने केवळ सुरक्षाच दिली नाही, तर चक्क एक किलोमीटर कार ढकलून ती सुरू करून दिली. पोलिसांच्या या संवेदनशीलतेमुळे एका मोठ्या संकटातून बचावल्याची भावना पाटोदा येथील पवार कुटुंबाने व्यक्त केली आहे.

 

पाटोदा येथील रहिवासी अरुण संतराम पवार हे आपल्या पत्नी आणि मुलांसह पैठण येथील कार्यक्रम आटोपून परतत होते. रात्री १ ते १.१५ च्या सुमारास बीड बायपास मार्गे मांजरसुंबा जवळ येत असताना अचानक त्यांची कार बंद पडली. निर्जन रस्ता आणि मध्यरात्रीची वेळ असल्याने पवार कुटुंब प्रचंड घाबरून गेले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी गाडीतच राहणे पसंत केले. अशातच गस्त घालत असलेले पोलीस उपनिरीक्षक गुंड, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि चालक चव्हाण यांची नजर या उभी असलेल्या गाडीवर पडली.

 

सुरुवातीला घाबरलेल्या पवार कुटुंबाला पोलिसांनी धीर दिला. गाडी दुरुस्त करण्यासाठी जाधव यांनी तातडीने काही मेकॅनिक्सशी संपर्क साधला, मात्र इतक्या रात्री कोणीही येण्यास तयार नव्हते. रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांकडेही मदत मागितली, पण यश आले नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेता, पीएसआय गुंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः गाडीला धक्का देण्याचा निर्णय घेतला. जवळपास एक किलोमीटरपर्यंत गाडी ढकलल्यानंतर अखेर ती सुरू झाली.

 

‘अशा रात्री तुम्हाला आम्ही असुरक्षित सोडून जाऊ शकत नाही,’ हे पोलिसांचे शब्द ऐकून आम्हाला पोलीस रूपाने देवदूतच भेटल्यासारखे वाटले, अशा भावना अरुण पवार यांनी व्यक्त केल्या. जर त्यावेळी पोलीस आले नसते, तर चोरी किंवा इतर कोणताही अनुचित प्रकार घडू शकला असता, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या कर्तव्यदक्ष कामाबद्दल अरुण पवार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन संबंधित तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली असून, बीड पोलीस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles