निधी उपलब्ध करून द्या नाही तर परीक्षा केंद्र रद्द करा
पुणे |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावी, बारावीची परीक्षा तोंडावर आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेच्या अनिवार्यतेवरून वाद निर्माण झाला आहे.शाळांना सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य असल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत शिक्षण संस्था महामंडळाने शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्यास परीक्षा केंद्र रद्द करून परीक्षा घेण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सीसीटीव्ही अनिवार्यतेसंदर्भातील विषय निवेदनाद्वारे मांडला आहे. ‘फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या शालांत परीक्षांवेळी गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्याचा सूचना निर्गमित झाल्या आहेत.
किती शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत याची पूर्ण माहिती असताना ज्या शाळांमध्ये यंत्रणा नाही, त्या शाळांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता न देण्याची कार्यवाही करता आली असती. ते न करता शाळा व्यवस्थापनावर सर्व जबाबदारी टाकून आपण आणि आपले शासकीय अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत खर्चिक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध न करून देणे ही आपली जबाबदारी आहे. ही यंत्रणा उपलब्ध न झाल्यास सदरील शाळांचे केंद्र रद्द करून आपण शालांत परीक्षा घ्याव्यात,’ असे महामंडळाने निवेदनात नमूद केले आहे.
महापालिका निवडणुकीची खैरात! घरांना मिळकतकर माफ, महिलांना हाफ तिकीट अन् मुलींना स्कूटर ..
गेल्या बारा वर्षांत शासनाकडून वेतनेतर अनुदान मिळालेले नाही. सरकारच्याच जिल्हा परिषद, शासकीय शाळांमध्येही सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. दहावी, बारावीच्या परीक्षा सीसीटीव्ही नसतानाही होतच होत्या. काही शाळांमध्ये गैरप्रकार होतात, म्हणून सरसकट सर्वांना वेठीला धरले जात आहे. केंद्रप्रमुखांची अदलाबदली केली जाणार आहे. त्यामुळे नियुक्त होणाऱ्या केंद्रप्रमुखांना ते काम करत असलेल्या शाळेबाबत काहीही माहिती नसणार आहे. सीसीटीव्ही बसवणे, भटके श्वान रोखणे असे काहीतरी चित्रविचित्र निर्णय घेतले जात आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी? इंग्रजी शाळांसाठी मराठी शाळा संपवण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केली.
बारावीच्या ८५ टक्के, दहावीच्या ८० टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. उर्वरित ठिकाणी यंत्रणा बसवण्याबाबत मुख्याध्यापक संघटना, अन्य संघटनांशी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद आहे. येत्या काही दिवसांत हा विषय मार्गी लावण्यात येईल.
– त्रिगुण कुलकर्णी, अध्यक्ष, राज्य मंडळ


