पुणे |
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
खरेतर, दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
विशेषतः यंदा प्रात्यक्षिक परीक्षांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, बाह्य परीक्षकांच्या नियुक्तीबाबत नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. बोर्डाच्या निर्णयानुसार, आता प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांसाठी बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे.
खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदानित शाळांमध्ये परीक्षक म्हणून पाठवले जाणार असून, अनुदानित शाळांतील शिक्षकांना इतर शाळांमध्ये परीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील ओळखी, दबाव किंवा गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
त्यानंतर १० फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. या काळात संबंधित शाळांमध्ये बाह्य परीक्षक उपस्थित राहून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेणार आहेत.
बोर्डाने परीक्षेतील गैरप्रकारांबाबत कठोर भूमिका घेतली असून, कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, केंद्राच्या संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
याशिवाय लेखी परीक्षांच्या वेळीही पर्यवेक्षक शिक्षकांची सरमिसळ करण्यात येणार आहे. म्हणजेच एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणार आहेत. अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांची ओळख असल्याने कॉपीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, पर्यवेक्षकांनाही त्यांच्या हालचाली कॅमेऱ्याच्या नजरेत राहतील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विश्वासार्ह होतील, असा विश्वास शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.


