बीड जिल्ह्यात सहा नगरपालिका क्षेत्रात निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. मात्र या दरम्यान न्यायालयात गेलेल्या उमेदवारांची निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामध्ये बीडमधील वॉर्ड क्र.३ ब. अंबाजोगाई वॉर्ड क्र. १ ब, ३ अ, ६अ, १० ब तर परळीमधील प्रभाग ३ मधील अ आणि ब, ९ अ, १९ च आणि १४ व तसेच धारूर तालुक्यातील प्रभाग १० अ अशा ११ नगरसेवकपदाच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार आहेत. त्या वॉर्डातील इतर नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजीच मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी उर्वरित जागेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
धारूरः प्रभाग १० अ ची निवडणूक लांबणीवर पडली आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया न्यायालयात पोहोचली होती. केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल धारूर नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मधील (अ) जागेसाठी अर्ज निकाली काढला. मात्र, निकाल वेळेत न आल्याने प्रभागातील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत निळे यांनी दिली. भाजपचे उमेदवार अजय गायसमुद्र यांचा अर्ज तांत्रिक चुकीमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला होता.
नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे कारण निवडणूक लांबणी पडल्याचे सांगण्यात येत आहे. अंबाजोगाई नगरपालिकेतील १५ प्रभागांतील ३१ नगरसेवकपदासाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार होती. मात्र, नामनिर्देशनपत्रावर आक्षेप घेतलेल्या वॉर्ड क्र. १ ब, ३५,६अ, १० ब येथील नगरसेवकपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून, त्यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार नाही.
न्यायालयाचा निर्णय २२ नोव्हेंबरपूर्वी येणे गरजेचे होते. कारण संबंधित उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक होते. मात्र, अपिलाचा निकाल उशिराने लागल्याने, लेखी निकाल वेळेत प्राप्तन झाल्याने, काही प्रकरणांत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून निर्णय घेतला.
परळीत ५ जागांच्या निवडणुका लांबणीवर
परळी नगरपालिका निवडणुकीत आक्षेप नोंदवलेल्या तीन प्रभागांतील पाच जागांच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ३ मधील दोन्ही जागांसह प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक १९ ब आणि प्रभाग क्रमांक १४ ब या चार जागेवरची निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे.
बीड पालिकेतील प्रभाग क्र. ३ ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष अमृत सारडा हे भाजपकडून तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगरसेवक अमर नाईकवाडे हे निवडणूक रिंगणात होते. नाईकवाडे यांनी अमृत सारडा यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप घेतला होता. यावर न्यायालयाने आक्षेप फेटाळून अर्ज मंजूर केला. मात्र, निवडणूक आयोगाने मतदानाच्या दोन दिवस आधी निर्णय जारी करून ही निवडणूक पुढे ढकलली.


