बीड |
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बीड विधानसभा प्रमुख योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा ईमेल द्वारे पाठवला. याबाबतची फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.यामुळे ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते . तत्पूर्वी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचा राजीनामा दिला. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याचे कारण त्यांनी राजीनामा देताना नमूद केले आहे. या नव्या पक्षांतरामुळे बीडच्या नगरपालिका निवडणुकीचे समीकरण बदलणार आहेत. नगरपालिका निवडणुकीमध्ये क्षीरसागर यांचा पगडा आहे.
बीड नगरपालिका निवडणूक समोर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील गटबाजी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून नगरपालिका निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया पक्षीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते. यामध्ये डॉ योगेश क्षीरसागर त्यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहत होते.
परंतु उमेदवार ठरविताना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचा डॉ. योगेश क्षीरसागर यांचा आरोप आहे. पक्षातील विविध गटांनी किती उमेदवार द्यायचे याबाबतही एकमत होत नसताना जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर निवडणूक प्रक्रियांच्या बैठका आमदार विजयसिंह पंडित यांच्या निवासस्थानी होऊ लागल्या. योगेश शिरसागर आणि थेट पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवला आहे.
बीडच्या नगरपालिकेमध्ये सातत्याने क्षीरसागर कुटुंबियाची सत्ता राहिली आहे. डॉ. योगश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या मातोश्री दीपा क्षीरसागर या बीड नगरपालिकेच्या अध्यक्षा होता. गेल्या काही वर्षापासून डॉ. योगेश हे पंकजा मुंडे यांच्या संपर्कात होते. ऐन निवडणुकीमध्ये डॉ. क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने निवडणुकीचे गणिते बदलणार आहेत. बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये गेल्या वेळी ‘ एमआयएम ‘चाही प्रभाव होता. आता भाजपने शहरातील सत्ता मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बीडचे आमदार शरद पवार यांचे समर्थक आहेत. संदीप क्षीरसागर यांना शह देता यावा तसेच शहरातील क्षीरसागर कुटुंबियांचे वर्चस्व भाजपच्या बाजूने वळावे म्हणून डॉ. योगेश यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.


