छत्रपती संभाजीनगर |
एकच मिशन; जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सुमारे 40 हजार कर्मचारी संपावर गेल्याने सर्व कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, कर्मचारी संपावर असल्याने त्यांना वेतन दिले जाणार नाही.असे सरकारने परिपत्रक काढले आहे.
शासन जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत गंभीर नसल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राज्याच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २००५ नंतर रुजू झालेले कर्मचारी २०३५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. या काळात कर्मचाऱ्यांची संख्याही फार कमी राहणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्तिवेतनावर एकूण उत्पन्नाच्या २४ टक्के खर्च होतच आहे. जुनी पेन्शन लागू केल्यास तो ३४ टक्क्यांवर जाईल. १० टक्क्यांच्या फरकाबाबत चर्चा करण्याची संघटनेची भूमिका आहे. मात्र शासन जुनी पेन्शन लागू करण्याबाबत निर्णय घेत नाही. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे डॉ. देविदास जरारे,तलाठी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात संप
राज्यातील १७ लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजता कर्मचारी एकत्र येऊन संपात सहभागी झाले. यामध्ये मराठवाड्यातील ४० हजार राज्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.