धुळे शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला दुसरा विवाह चांगलाच महागात पडला आहे. त्याला त्याची सरकारी नोकरी गमवावी लागली आहे. शहरातील तरुणीला पळवून नेत तिचे धर्मांतर करत त्याने त्याचे आधी लग्न झालेले असतानाही तिच्याशी दुसरा विवाह केला. पोलिस कर्मचारी शाकीब कलीम शेख याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
कलीम शेख हा 18 जून 2017 ला पोलिस भरतीतून पोलिस सेवेत दाखल झाला. पोलिस कर्मचारी शाकिब कलीम शेख आझादनगर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. 5 नोव्हेंबर 2023 ला त्याचा पहिला विवाह झाला होता. यानंतर त्याने दुसरा विवाह केला. यात संबंधित तरुणीशी 30 डिसेंबर 2024 ला खोटे धर्मांतर करून तिचे नवीन नामकरण त्याने केलं. त्यानंतर मग 1 जानेवारी 2025 ला तिच्याशी मुस्लिम पद्धतीने विवाह केला.
संबधित तरुणीला पळवून नेण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला पुण्यात तीच्या माहेरी सोडले. आपण शिर्डी येथे बंदोबस्तासाठी जात असल्याचे कारण त्याने सांगितले होते. पहिल्या पत्नीपासून त्यास तीन महिन्यांचे अपत्य देखील आहे. परंतु हा प्रकार समजल्यावर त्याच्या पत्नीने शाकीब विरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला शाकीबवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आता त्याच्या बडतर्फीचे आदेश दिले.
या प्रकरणी त्याच्या पहिल्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी जीवन बोरसे यांनी 6 जानेवारीला याप्रकरणाचा प्राथमिक स्तरावर तपास केला. नंतर 28 जानेवारीला पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विभागीय चौकशी केली. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात संशयित पोलिस शाकीब शेख याच्यावर गुन्हाही दाखल झाला. याप्रकरणी त्याच्या आईवडिलांनाही आरोपी करण्यात आले होते.
या गुन्ह्यात नंतर संशयितांना २४ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात संशयित शेख यास शासकीय सेवेतून निलंबित केले होते. यानंतर पोलिस प्रशासनाने जलद हालचाली करत चौकशी करुन संशयित शेख यास 11 ऑगस्टला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.