राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपले आहे. २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येईल. मतदान तोंडावर आले असतानाच विविध संस्स्थांचे सर्व्हे समोर आले आहेत. असाच एक सर्व्हे भाजपानेही केला आहे. ज्याची माहिती स्वतः भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी निवडणुकीच्या येणाऱ्या निकालावर भाष्य करताना सांगितले की, ‘आमच्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९५ ते ११० जागा मिळू शकतात. शिवसेनेला ४० ते ५० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला १६५ जागांपर्यंत मजल मारेल.’ विनोद तावडेंनी सांगितलेले आकडे पाहता महायुतीत भाजपा आणि शिवसेना त्यांच्या आमदारांची संख्या कायम राखताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने १०५ जागांवर विजय मिळवला होता. भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता. आताही भाजपाला जवळपास तितक्याच जागा मिळतील, असे भाजपाचा सर्व्हे सांगतो.