– ‘महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. महायुती सत्तेत येण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रामाणिकपणे प्रचार करायचा आहे. कोणी गद्दारी केली, तर त्याला पक्षातून काढून टाकले जाईल,’ असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. इचलकरंजी येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बावनकुळे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, असा खोटा प्रचार करून काँग्रेसने त्यांचे खासदार निवडून आणले. काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात. महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू, कृषी पंपाचे महायुती सरकारने केलेले शून्य बिल पुन्हा देऊ, असे म्हणत आहेत.
यामधून महाविकास आघाडीचे सरकार जनतेसाठी नाही, तर मुख्यमंत्री पदासाठी काम करणारे सरकार आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याबाबत जनताच महाविकास आघाडीला जाब विचारणार आहे.’
ते म्हणाले, ‘भाजपची सत्ता असेपर्यंत आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाचे आरक्षण काढून घेणार नाही. तसेच सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनाही कायमस्वरूपी पुढे सुरू राहतील. आपण महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. महायुतीला परत सत्तेत आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करावा. कोणीही गद्दारी केली, तर त्याला पक्षातून काढून टाकले जाईल.’