विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तेव्हापासून राज्यातील सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भेठीगाठी आणि बैठका देखील वाढल्या आहेत. तसेच अंतर्गत खलबतं सुरु आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तिसरी आघाडी देखील प्रयत्नांमध्ये असून राज ठाकरेंनी देखील निवडणूक लढणार असल्याचा एल्गार दिला आहे. पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका ही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची ठरणार आहे. अंतरवली सराटीमध्ये नेत्यांचे दौरे वाढले असून रात्रीच्या भेठीगाठी वाढल्या आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षांपासून राजकारण्यांची झोप उठवली आहे. आंदोलन आणि उपोषण करुन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. आता आचारसंहिता सुरु झाली असून जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मनोज जरांगे पाटील हे आज (दि.17) मराठा इच्छुक उमेदवारांची चर्चा करणार असून येत्या 20 तारखेला मराठा समाजाचा कौल घेणार आहेत. त्यानंतर लढवणार की पाडणार याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मराठा समजाकडून मोठा फटका बसू नये म्हणून या राजकीय भेटी वाढल्या आहेत.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. रात्री दोनच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची विखे पाटलांनी भेट घेतली आहे. मागील आठ दिवसांमध्ये विखे पाटलांची ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतची दुसरी भेट आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली. या भेटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची काय चर्चा झाली हे समोर आलेले नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांना इशारा दिला. कडक शब्दांमध्ये इशारा देत जरांगे पाटील यांनी ठणकावून आपली भूमिका मांडली. आता जरांगे पाटील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार का याचा निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये घेणारा आहेत. यापूर्वी निवडणूकीमध्ये न उतरता देखील जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फटका महायुतीला लोकसभेमध्ये बसला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये हा दगाफटका होऊ नये याची काळजी नेते करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे काय राजकीय भूमिका घेतात याची काळजी सर्व राजकीय पक्षांना लागली आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे किंगमेकर ठरत असून त्यांच्याभोवती राजकारण फिरते आहे.