2.5 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

अजित पवार गटाने स्वतंत्र विधानसभा लढावी; अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्याची माहिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. तो विधानसभेला बसू नये म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत भाजप आणि शिंदेंनीच एकत्र लढावं, आणि अजित पवार गटाने स्वतंत्र विधानसभा लढावी, असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

 

महायुतीत अजित पवारांना सामावून घेतल्याने भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला. ज्या उमेदवारांनी २०१९ ला एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढली होती. तेच उमेदवार आता एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय. अजित पवारांना महायुतीत घेण्यावरून संघानेही आपली नाराजी उघडउघड बोलून दाखविली आहे. त्यामुळे भाजपने आता राज्यात वेगळी रणनिती आखल्याचे सांगण्यात येत आहे.

 

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्रितच लढणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. त्यामुळेच भाजपने नवी रणनिती आखल्याचे सांगितलं जात आहे. यानुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुक एकत्रित लढवावी, आणि अजित पवारांनी स्वतंत्रपणे लढवावी. यातच ज्या मतदारसंघात अजित पवारांचे प्रभावी उमेदवार आहेत. त्यांना इतर दोघांनी पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडावा. तसेच ज्या ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार प्रभावी आहे. तिथे अजित पवार गटाने पाठिंबा द्यावा. अशी नुरा कुस्ती खेळावी, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याची माहिती आहे.

 

भाजपने आखलेल्या नव्या रणनितीमुळे शरद पवारांसह ठाकरे आणि कॉंग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण एकाच मतदारसंघात अजित पवार गटाचा उमेदवार, दुसरा भाजप किंवा शिंदे गटाचा तर तिसरा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार असणार आहे. यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल असंही बोललं जात आहे. त्याचबरोबर निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा महायुतीत यावं असंही ठरल्याचं समजत आहे. तर मुख्यमंत्री म्हणून कोण याचा निर्णय निकालानंतर घेऊ ? अशीही माहिती सुत्रांनी दिलीय.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles