लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वच पक्षांसह प्रशासनाकडूनही आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आलीयं. अशातच आता एकाच जागी 3 वर्षांपेक्षा अधिका काळ नोकरी करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भातील पत्रच निवडणूक आयोगाकडून राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं आहे.
जिल्ह्याच्या महसूल विभागासाठी हा आदेश लागू करण्यात आला असून ज्या अधिकाऱ्यांचा निवडणूक संचलनालयाशी थेट संबंध येत नाहीत अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात येणार असल्याचंही आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. आगामी वर्षात देशातील हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरु राहणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आलं आहे. तर हरयाणामध्ये 3 नोव्हेंबर, झारखंडमध्ये 5 जानेवारी 2025 या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशासंदर्भात अधिकाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशिष्ट कारणासह प्रकरणे निवडणूक आयोगाकडे पाठवू शकतात, अधिकाऱ्यांच्या अडचणींचा विचार करुन निवडणूक आयोगाकडून निर्देश जारी करण्यात येणार असल्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाची ही अधिसूचना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, गृह विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह निवडणूक काळात तैनात केलेल्या शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे.