एसटी बसच्या प्रवासभाड्यात सवलत मिळावी, यासाठी अनेक महिलांनी आधार कार्डवर वय वाढवले आहे. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होताना दिसून येत आहे.
एसटीच्या मोफत प्रवासासाठी काही महिलांनी आधार कार्डवर ७५ वर्षे वय करून घेतलेले आहे. आता मुख्यमंत्री लाइकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वय कमी करण्याचा खटाटोप करावा लागत असल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे काही महिलांची चांगलीच अडचण केली आहे. आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक महिला सेतू केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
महिलांसह पुरुषांकडेही विविध वयांचे आधार कार्ड एसटीच्या वाहकांना आढळून येतात. अनेकदा यावरून वाहक व ज्येष्ठांमध्ये वादही होतात. आता तेच ज्येष्ठ लाडकी बहीण योजनेसाठी वय कमी करून घेत आहेत. या योजनेत २१ ते ६७ वर्षे वयाची अट आहे. अनेक महिलांनी वय कमी असतानाही ७५ वर्षे वय करून घेतले आहे. आता त्या आपले खरे वय असलेले आधार कार्ड बनवण्यासाठी धडपडत आहेत.
सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी
सेतू सुविधा केंद्रांवर लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांबरोबरच आधार कार्डात वयाची दुरुस्ती करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
खऱ्या आधार कार्डची शोधाशोध
काही ज्येष्ठ महिलांकडे विविध वयाचे आधार कार्ड अनेकदा आवळून आलेले आहेत. यापैकी आता लाडकी बहीण योजनेसाठी कोणते आधार कार्ड चालेल, याची शोधाशोध सुरू असल्याचे दिसून येत आहे .