-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

दर्शना पवारचा खूनच ! पोस्ट मार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे 12 जून रोजी दुचाकीवरून राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली.

 

सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे धक्कादायक वास्तव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता राहुलचे लोकेशन बाहेरच्या राज्यात असल्याचे समोर येत आहे. राहुल पसार झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्याभोवती फिरू लागली आहे. जोपर्यंत तो ताब्यात मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला? हे समजू शकणार नाही.

 

दर्शना नुकतीच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नर्‍हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती.

 

तिच्यासोबत राहुल होता. 12 जूननंतर तिचा मोबाईल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली होती.

 

तिच्यासोबत मलाही जाळा !

दर्शनावर कोपरगाव शहरातील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पुण्यावरून दर्शनाचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका स्मशानभूमीत दाखल झाली. पांढर्‍या कपड्याच्या आवरणात लपटलेला दर्शनाचा निपचित देह पाहताच तिच्या आईने हंबरडा फोडला. ‘लेकीनं अभ्यासासाठी वनवास झेलला. दोन वर्षे स्वतःला अभ्यासासाठी कोंडून घेतले. अख्ख्या गावाने सत्कार केला. तिच्याच चितेवर आज हार पडले.

 

तिला एकटीला जाळू नका. तिच्यासोबत मलाही जाळा,’ अशा शोकमग्न भावना तिच्या आईने व्यक्त केली. दर्शनाच्या लहान भावाने तिला मुखाग्नी दिला .दर्शनाच्या अभिनंदनाचे बोर्ड कोपरगावात झळकले होते. कारखान्यातील वाहनचालकाची लेक क्लास वन अधिकारी झाल्याने सर्वांनी दर्शनावर कौतुकाचा वर्षाव केला होता. दर्शनाच्या सत्काराचे बोर्ड गावात अजूनही उतरलेले नसताना दर्शनाच्या मृत्यूची बातमी धडकताच कोपरगावकरांना धक्का बसला.

 

दर्शनाच्या मृत्यूचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्यात तिच्या शरीरावर जखमा असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये तिचा खूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles